![onion](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/12/onion-696x447.jpg)
नगर तालुक्यात सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी, लागवड झाली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील काही भागात गव्हाची सोंगणी सुरू असून, काही ठिकाणी गहू काढणीला आला आहे. गव्हाचे पीक जोमदार आले असले, तरी गावरान कांदा उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. गावरान कांद्याला अनेक भागांत पाणीटंचाईची झळ बसणार असल्याचे चित्र आहे.
नगर तालुका दुष्काळीपट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु तालुक्यात झालेल्या जलसंधारण व बंधाऱ्यांमुळे गेल्या दशकांपासून रब्बी पिके जोमदार येत आहेत. चालूवषीं तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जेऊरपट्ट्यातील बहुतांशी तलाव, बंधारे भरलेच नाहीत. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार आहे. इमामपूरसारख्या डोंगर उतारावर वसलेल्या गावांना गव्हाच्या पिकालाही पाण्याची कमतरता जाणवली. त्यामुळे गव्हाचे उत्पन्नदेखील घटले आहे.
ज्वारीचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने नगर तालुक्याची ‘कांद्याचे पठार’ म्हणून ओळख निर्माण होत आहे. लाल कांदा, रांगडा कांदा, गावरान कांदा उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे राज्य तसेच राज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी तालुक्यात स्थायिक होऊन कांद्याच्या खरेदी-विक्रीचा व्यापार सुरू केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेताच्या बांधावर कांद्याची खरेदी नगर तालुक्यातूनच होत आहे. तालुका हा कांदा खरेदी-विक्रीचे केंद्रबिंदू बनला आहे.
पावसाळ्यात पिंपळगाव माळवी तलाव, जेऊर, इमामपूर, डोंगरगण पट्ट्यातील बहुतांशी तलाव कोरडेच राहिले. नद्या-नाले वाहते झालेच नाहीत, त्यामुळे जेऊर पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे.
जेऊर, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी या पट्ट्यांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवायला लागली आहे. मका, कडवळ चारा पिके जोमात आहेत. परंतु गावरान कांद्यासाठी पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. तालुक्यात गव्हाचे पीक जोमदार आले असून, कांद्याच्या उत्पादनात मात्र घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे. चास, अकोळनेर, रुईछत्तीशी, चिचोंडी पाटील पट्ट्यातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाबाबत थोडा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगररांगा विखुरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावे डोंगर रांगांच्या तीव्र उतारावर कुशीत वसलेली आहेत. अशा गावांची उन्हाळ्यात भूजलपातळी झपाट्याने खालावत असून, तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत. रब्बीतील चारा पिके तसेच गव्हाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होणार असले तरी गावरान कांद्याच्या उत्पादनावर पाणीटंचाईचे संकट आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते.
ससेवाडी गावात गावरान कांदाच नाही
ससेवाडी गाव कांदा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. चालूवर्षी लाल कांद्याचे उत्पादन झाले. परंतु पाण्याअभावी गावरान कांद्याची लागवड झाली नाही. सीना नदीचे उगमस्थान असलेल्या ससेवाडी गावात मोठे कांद्याचे उत्पादन होत असते. परंतु, सद्यस्थितीत गावरान कांद्याची लागवड झालेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी लवकरच टँकर सुरू करावे लागणार असल्याचे माजी उपसरपंच शंकर बळे यांनी सांगितले.
बहिरवाडीत टँकरचा प्रस्ताव
बहीरवाडी गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी गावरान कांद्याचे पीक सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, पंचायत समितीकडे सादर करण्यात येणार असल्याचे सरपंच अंजन येवले यांनी सांगितले.