पालिकेने 714 कोटी थकवले; ‘जलसंपदा’ ने तोंडचे पाणी पळवले

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदाचे वर्ष पुणेकरांना चांगले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाणीपुरवठा कमी करण्याचा इशारा दिल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पुण्यात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

कृष्णा खोरे महामंडळ म्हणजेच जलसंपदा विभागाने महापालिकेने पाणी वापराबाबतची 714 कोटींची थकबाकी 25 फेब्रुवारीपर्यंत भरावी; अन्यथा पाणीकपात केली जाईल, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहे. तसेच सध्या पाण्याचा वापर कमी करणे हाच उपाय आहे. पुणेकरांना पाणी काटकरीने वापरण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असले तरी पाणीपुरवठा करण्यास कोठेही अडथळा येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी म्हटले आहे. थकबाकी भरण्याबाबत दुसरी नोटीस जलसंपदा विभागाने महापालिकेला बजावली आहे. पाणीपट्टी वेळेत न भरल्यास पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे.

जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यात सातत्याने पाण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे. महापालिकेकडून जादा पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, जलसंपदा विभागाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. याबाबत महापालिकेने मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यावरही अद्यापि निर्णय झालेला नाही.

करारानुसार 11.50 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. मात्र, महापालिका मंजूर कोट्यापेक्षा साडेपाच ते आठ टीएमसी पाणी अतिरिक्त वापरते. या अतिरिक्त पाण्यासाठी पालिकेला जलसंपदा विभागाने दंड केला आहे. मात्र, हा दंड पालिकेने भरलेला नाही. हा दंड जादा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

सचिवांकडून गंभीर दखल

■ महापालिकेकडे आतापर्यंत 541 कोटींची थकबाकी होती. त्यात चालू वर्षाची (2025-26) 173 कोटी 85 लाख थकबाकी अद्यापि भरली नसल्याने 714 कोटींची नोटीस गेल्या महिन्यातच बजावली होती. मात्र, या नोटिशीला महापालिकेने प्रतिसाद दिलेला नाही. जलसपंदा विभागाच्या सचिवांनी त्याची गंभीर दखल घेतली असून, 31 मार्चपर्यंत ही थकबाकी भरण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. महापालिकेने थकबाकीची रक्कम जमा केल्यानंतरच धरणांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

कृष्णा खोरे महामंडळाकडून केल्या जाणाऱ्या जादा पाणीपट्टी आकारणीबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अपील केले आहे. अद्यापि त्यावर निर्णय झालेला नाही. काटकरीने पाणी वापरण्याचे धोरण महापालिकेकडून राबविले जाईल. काटकसर करणे हाच सध्यातरी उपाय आहे.
नंदकिशोर जगताप, प्रमुख पाणीपुरवठा विभाग.