शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पाण्यासाठी हंडा मोर्चा, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची माहिती

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी शहरवासीयांची अवस्था झाली आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असतानाही सत्ताधारी भाजप मिंधेगटाच्या लोकप्रतिनिधींकडून होणारे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बारा ते पंधरा दिवस उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून तारीख पे तारीख जाहीर केली जात आहे. शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्यासाठी महिनाभरात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंडा मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

संभाजीपेठेतील शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, शहरासाठी मंजूर करून आणलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असते तर चार वर्षापूर्वीच शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू झाला असता. परंतु, भाजपच्या काही स्थानिक नगरसेवकांनी ही योजना बंद पाडली. आता केंद्राच्या अमृत-२ योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पाणी मिळण्यास वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. पाण्यासाठी फडणवीस यांनी शहरात मोर्चा काढला होता. या मोर्चात त्यांनी सत्तेवर येताच शहरावर कोणताही बोजा पडू न देता दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शहरवासीयांना पाणी काही मिळाले नाही.

सध्या उन्हाळा सुरू होताच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जीर्ण झाल्याने वारंवार फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. बारा ते पंधरा दिवस उलटूनही पाणीपुरवठा केला जात नाही. पर्यायी उपाययोजना राबविण्यात येत नाही. सत्ताधारी भाजप आणि मिंधेगटाच्या लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईचे काही सोयरसुतक नाही. पाण्यासाठी नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे. दिवसेंदिवस शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनत चालला असून नागरिकांना पैसे खर्च करून विकत पाणी घ्यावे लागत आहे. पाणी प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महिनाभरात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.