
शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणामधून नगर तालुक्यातील गावांसाठी होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरूर तालुक्यातील मूळ लाभार्थी शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, ही योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकरी, ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस तीव्र विरोध सुरू केला आहे. याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, शेतकरी सुभाष पवार, हरिचंद्र पवार, संदीप सूर्यवंशी, प्रदीप काळे, माउली नागावडे, वसंत रोकडे, अनिल ओव्हाळ पाटील उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील चिंचणी गावात घोड धरण असून, साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा विरोध या धरणाचा पाणीसाठा सुमारे 7 टीएमसी आहे. या धरणाच्या पाण्यामुळे शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक गावे जलसिंचनाखाली आलेली आहेत. या धरणामधून दोन कालवे असून, एक श्रीगोंदा तालुक्यातील गावातील मूळ लाभार्थ्यांसाठी आहे, तर दुसरा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, तसेच याच धरणामधून पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा होत आहे. तसेच अनेक पिण्याच्या पाणीपुरवठा योजना असून, अनेक शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन योजना आहेत.
उन्हाळ्यामध्ये धरणातून होत असलेल्या कालव्यातील आवर्तनांना मुळात आताच मोठ्या प्रमाणात अडचण येत असून, मे महिन्यात पिके अडचणीत येत असतात. अशातच आता नवीन साकळाई उपसा जलसिंचन योजनेला शासनाने परवानगी दिली असल्याचे दिसून येत आहे.
या योजनेमुळे नगर तालुक्यातील वाळकी, चिखली अशी ३२ गावे ओलिताखाली आणण्याचा सरकारचा मानस दिसून येत आहे. या उपसा सिंचन योजनेसाठी 1.8 टीएमसी म्हणजेच सुमारे २ टीएमसी पाणी लागत आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनदेखील योजनेचा हेतू सफल होण्याबद्दल शांशकता निर्माण होत आहे. कारण ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?’ आधीच या धरणातून पाण्यासाठी आदळआपट सुरू आहे. त्यामुळे सरकारने अशा पद्धतीचा नाहक खर्च करू नये. त्यापेक्षा कुकडी कालव्यातून विसापूर धरणात पाणी सोडून त्यातून सदर योजना राबविल्यास जास्त लाभदायक व कमी खर्चात यशस्वी योजना राबविता येईल.
साकळाई जलसिंचन योजनेमुळे या धरणावर अवलंबून असलेले शिरूर तालुक्यातील मूळ धरणग्रस्त, चिंचणी, शिंदोडी, वडगाव यांनाही याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच या धरणाच्या दोन्ही कालव्यांवरचे मूळ लाभार्थी शेतकरीदेखील अडचणीत येणार, यात तीळमात्र शंका नाही.
त्यामुळे साकळाई जलसिंचन योजनेस स्थानिक शेतकरी, तसेच दोन्ही कालव्यांवर अवलंबून असलेले शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांतील मूळ लाभार्थी शेतकरी यांचा विरोध असून, शासनाने ही योजना बळजबरीने लादल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी जनआंदोलन करतील, याची दक्षता शासनाने घ्यावी, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले आहे.