दररोज 140 एमएलडी पाणी मिळतेय, दोन दिवसाआड पाणी का नाही? शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मनपावर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज 240 एमएलडी पाण्याची आवश्यकता असून जायकवाडी धरणातून दररोज 152 एमएलडी पाणी उपसा केला जात आहे. त्यापैकी शहराला रोज 140 एमएलडी पाणी मिळत आहे. तर मग संपूर्ण शहराला दोन दिवसाआड पाणी का मिळत नाही? हे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासकांना अपयश आले आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. यासाठी शिवसेनेने ‘लबाडांनो, पाणी द्या!’ आंदोलन हाती घेतले आहे. मनपा प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी व जनतेला पाणी मिळवून देण्याकरिता शिवसेना मैदानात उरतली आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या वतीने ‘लबाडांनो, पाणी द्या’, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलत होते. यावेळी दानवे म्हणाले की, शहरासाठी राबविण्यात येत असलेली नवीन पाणी योजना कधी पूर्ण होईल याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही. हे आंदोलन त्याच्यासाठी नाही. मागे काय झाले, कुणी काय केले या राजकीय वादातही आम्हाला जायचे नाही. सध्या शहरात दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मनपा प्रशासक पाण्याचे नियोजन करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.

पाणीपट्टी वर्षाची.. 12 महिन्यात मिळतेय फक्त 26 दिवस पाणी

मनपा पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबविते, नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी वसूलही केली जाते. त्याबदल्यात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करणे बंधनकारक असतानाही मनपाकडून 12 महिन्यात फक्त 26 दिवस पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाणीपुरवठा केलेल्या महिनाभराचीच पाणीपट्टी प्रशासक वसूल करतील का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, आनंद तांदुळवाडीकर, लक्ष्मण सांगळे, संघटक दिग्विजय शेरखाने, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख संजय हरणे, राजेंद्र दानवे, विभागप्रमुख नंदू लबडे, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनिता देव, आशा दातार, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, मीना फसाटे, सुकन्या भोसले, युवा सेना सहसचिव अॅड. धर्मराज दानवे, युवती सेनेच्या रोहिणी पिंपळे, दीपाली पाटील, कोमल पांढरे आदींची उपस्थिती होती.

अभियंत्यांना सोबत घेऊन पाणी प्रश्न सोडवावा

महापालिकेतील अभियंते अत्यंत हुशार आहेत. शहराला दोन किंवा तीन दिवसांआड पाणी देण्यासाठी मनपा प्रशासकांनी अभियंत्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून काम करून घ्यावे, दोन किंवा तीन दिवसाआड पाणी दिले, तर शिवसेनेचे आंदोलन मागे घेऊ. त्यांनी ही धमक दाखवावी, असेही दानवे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

लेआऊट मंजूर करणे, क्रिकेट खेळण्यातच व्यस्त

शहराला दररोज 240 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी रोज 140 एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. ही उपलब्ध पाणी दोन दिवसाआड देता येऊ शकते. मनपा प्रशासकांनी मनात आणले तर शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करता येईल, परंतु, प्रशासकांची मानसिकता पाणी मिळवून देण्याची नाही. त्यांना गरवारे स्टेडीयमवर फ्लड लाईटमध्ये क्रिकेट खेळणे, मोठ्या निविदा मंजूर करणे, शहराचे लेऑऊट मंजूर करणे, पालकमंत्र्यांची चापलूसी करणे या कामात ते व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील शहरातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत असूनही प्रशासक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा गंभीर आरोपही अंबादास दानवे यांनी केला.