साताऱ्यातील 14 गावांत पाण्यासाठी वणवण; 26 हजार नागरिकांना टँकरने पाणी

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढू लागला आहे. यामुळे पाणीस्त्रोत आटू लागल्याने गावोगावी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 14 गावे, 123 वाड्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आणखी पुढील दोन महिने जिल्ह्यात परिस्थिती आणखी भयाण होण्याची चिन्हे आहेत.

सातारा जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाईबरोबर चाऱ्याचीही टंचाई जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. मार्च महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पुढील एप्रिल व मे महिन्यात दुष्काळाचे भीषण सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभूखेड, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती या 16 गावांसह 123 वाड्यांमधील 26 हजार 168 नागरिक व 13 हजार 842 जनावरांना 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांना दररोज पाण्याचा टँकर कधी येतोय याची वाट बघावी लागत आहे. गावे व वाड्यावर टँकरच्या सुमारे 51 खेपा होत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.