नागपुरात घरात पाणी शिरले; लोकांच्या संतापाचा स्फोट, रस्ता उखडला

रविवारी नागपूरमध्ये झालेल्या जोरदार पावसात दहा हजारांवर घरांत पाणी शिरल्यामुळे पावसाळापूर्व कामे केल्याच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली असून  रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सिमेंट रस्त्यांमुळेच हे पाणी अडल्याने घरात पाणी शिरल्याचा आरोप करण्यात येत असून संतप्त नागरिकांनी आज मानेवाडा-बेसा मार्गावरील सिमेंट रस्ता अक्षरशः तोडून पाण्याला वाट मोकळी करून दिली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

नागपूरमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रात पाणी तुंबले. रस्ते पाण्याखाली गेले. घरांमध्ये पाणी शिरले. विमानतळ परिसरही  पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे पालिकेची चांगलीच नाचक्की झाली आहे. यामध्ये आता सिमेंट काँक्रीट रस्त्यांमुळे घरात पाणी घुसल्याच्या रागाने रहिवाशांनी रस्ताच उखडून टाकल्याची घटना घडली आहे. पाणी तुंबण्यास सिमेंट रस्ते बांधणीच कारणीभूत असल्याचा आरोप सार्वत्रिकरीत्या केला जात आहे. मानेवाडा-बेसा मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे  दुसऱ्या बाजूने काम सुरू आहे. रस्त्यालगत असलेल्या वस्त्यांकडे जाता यावे म्हणून सिमेंट रस्त्याला डांबरी रस्त्यांचा जोड देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी 20 जुलै रोजी पाणी तुंबून लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोक संतप्त झाले.  विशेष म्हणजे खुद्द महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनीसुद्धा नागपूरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरण्यासाठी सिमेंट रस्ते कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जोडरस्ता फोडल्यास वस्त्यांमधील पाणी बाहेर पडेल असे गृहीत धरून बेसा-मानेवाडा मार्गावरील काही नागरिकांनी डांबरी रस्ता तोडून पाण्याला मार्ग करून दिला. दरम्यान या भागातील नागरिकांनी रस्ते बांधणीच्या वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्याबाबत विचारणा केली होती, मात्र अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही.

भाजप नेत्यांचे नातेवाईकच कंत्राटदार

नागपूरमध्ये शहराच्या विविध भागांतही सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये काही ठिकाणी एका बाजूचेच काम झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम शिल्लक आहे. एक वर्ष ते दीड वर्षापासून अर्धवट कामे पडून आहेत. यामुळे वाहतुकीलाही फटका बसत आहे. पावसाळय़ात अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचते, दुसरीकडचा रस्ता बांधण्यात आल्याने पाणी बाहेर पडण्याचे मार्ग बंद होत आहेत. त्यामुळे जागा मिळेल तेथे पाणी शिरत असल्याने लोकांच्या घरात पाणी घुसत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनीच ही कामे दुसऱ्याच्या नावावर घेतल्याचे बोलले जात आहे.