नव्या वर्षात ठाणे महापालिका इन अॅक्शन झाली आहे. 147 कोटींची पाणीपट्टी थकवणाऱ्या 2 हजार 600 ठाणेकरांचे पाणी तोडण्यात आले असून चालढकल करणाऱ्या 2 हजार 330 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात फक्त 78 कोटींची वसुली करण्यात यश आले असून हे प्रमाण केवळ 35 टक्के एवढे आहे. मार्च महिन्यापर्यंत 147 कोटींच्या थकबाकी वसुलीचे प्रशासनाला टेन्शन असून पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामानाने पाणी कमी पडत आहे. त्याचे नियोजन करताना प्रशासनाला चांगलीच दमछाक करावी लागते. मात्र अनेक ठाणेकर नागरिक पाणी वापरूनही बिल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे.
प्रभागनिहाय वसुली
माजिवडा मानपाडा – 14,86,48,148
नौपाडा कोपरी 10,21,89,389
वर्तकनगर : 7,75,14,790
उथळसर 6,52,60,835
कळवा : 08,08,10,765
वागळे : – 4,06,22,570
लोकमान्य – सावरकरनगर: 05,95,20,905
मुंब्रा : 6,47,32,779
दिवा :- 06,84,27,514
मुख्यालय – सीएफसी – 07,20,28,585
एकूण :- 77,97,56,280
त्यामुळे महापालिकेने विशेष मोहीम डिसेंबर महिन्यात राबवली. या मोहिमेंतर्गत 2 हजार 606 नळ कनेक्शन तोडण्यात आले. तर 411 मोटरपंप व 73 पंप रूमदेखील सील केले असून एकट्या डिसेंबरमध्ये 51.85 कोटी रुपयांची वसुली केली आहे.
वसुली फक्त 35 टक्के प्रशासनाला टार्गेटपूर्तीचे टेन्शन
• पाण्याचे बिल थकवणाऱ्या नागरिकांचे थेट नळ कनेक्शनच कापावे असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मोटरपंप जप्त करणे, मीटर रूम सील करणे अशा कारवाया केल्या जात आहेत.
● 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पाण्याचे एकूण बिल 225 कोटी रुपये एवढे आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत अत्यंत कमी वसुली झाल्याने उरलेल्या तीन महिन्यांत टार्गेट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.
• पालिकेने घरगुती ग्राहकांसाठी थकीत बिलावर शंभर टक्के प्रशासकीय सूट दिली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही सूट 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.