
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाचे चटके असह्य होत आहे. जागतिक तापमानवाढीचे वर्ष असल्याने उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई आणि परिसरात तापमान 40 अंशाच्या आसपास आहे. तसेच राज्यातही तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. आता वाढणारे तापमान आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा राज्याला मुकाबला करावा लागणार आहे.
राज्यातल्या अनेक भागात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विहीरीतील पाणी आटले आहे. तर धरणातील पाण्याचेही वाढत्या तापमानामुळे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. सर्वात जास्त पाणीटंचाईचे संकट मराठवाड्यात दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढलेला बघायला मिळत आहे.
मराठवड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात केवळ 58 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवनामुळे धरणाच्या पाणी साठयात घट झाल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाड्याच्या प्रमुख 44 छोटे मोठे धरण मिळून केवळ 55 टक्के पाणी साठा उरलेला आहे. तर पाझर तलाव हे आताच पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे आता उन्हाळ्याचे 2 महीने कसे जाणार असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आत्तापासूनच टँकरने पाणी पुरवठा होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल धरणातला पाणी साठा हा निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पाणी टंचाईचे संकट बिकट होण्याची शक्यता आहे.