
रायगड जिल्ह्यातील सात धरणांमध्ये अवघा 35 ते 40 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तळ गाठलेल्या प्रकल्पांमध्ये घोटावडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानीवली, वरंध, कोथुर्डे या धरणांचा समावेश आहे. एप्रिल, मे महिन्यात हा साठा आणखीनच कमी होणार आहे. त्यामुळे पेण, सुधागड, महाड तसेच श्रीवर्धन तालुक्याला तीव्र पाणीटंचाईचा तडाखा बसणार आहे. या संभाव्य संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून 20 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात काही गावांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टंचाईच्या झळा बसू लागल्याने टँकरच्या पाण्यावर गावकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडत आहे.
रायगड जिल्ह्यात कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत 28 धरणे आहेत. यामधील सात धरणांमध्ये 40 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानीवली, वरंध, कोथुर्डे या धरणांचा समावेश आहे. ही सर्व धरणे महाड, पेण, सुधागड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. त्यामुळे सध्या धरणांमधून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात सुमारे 20 ते 30 टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. काही गावात तर पाणीबाणीची स्थिती असून खेड्यापाड्यातील महिला लहान मुलांसह दोन-दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी भरत आहेत.
तात्पुरत्या मलमपट्टीचा फटका
रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही दरवर्षी जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येते. पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजना करण्यावरच प्रशासनाचा जोर आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे त्याच त्याच गावांना पाणीटंचाईची झळ बसत असल्याचे दिसून येते. डावली रांजणखार गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पाच कोटींचा कृती आराखडा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी 5 कोटी 62 लाख 69 हजार खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधण विहिरी खोदण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती तसेच इतर उपाययोजना करण्यात येणार आहे.