
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पाणीटंचाईने आता उग्र रूप धारण केले आहे. गाव आणि पाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे बोअरिंगमधून फार कमी प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी वाडा तालुक्यातील कवठे पाडा, गावठाण पाडा आणि नदी पाडा गावातील महिलांना रात्रभर बोअरिंग आणि विहिरीवर मुक्काम करावा लागत आहे. बोअरिंगवर बसवलेल्या हापशातून हंडाभर पाणी हापसताना महिला आणि ग्रामस्थांच्या नाकीनऊ येत आहे. तालुक्याच्या विविध भागात इतकी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सरकारी योजना मुरल्या कुठे, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
वाडा तालुक्याला प्रत्येक वीं उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदा पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे तालुक्याच्या विविध भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. नदी पाडा, कवठे पाडा, गावठाण पाडा, अंभरभुई, गायगोठा, कोशिमशेत, उज्जनी, आखाडा, भगतपाडा, वडवली, विरे, सातरोंडे, साखरशेत, घातपात पाडा, भोकरपाडा आणि वंगणपाडा विहिरी आणि बोअरिंग आटल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. त्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
नदीपाडा आणि गावठाण पाड्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी बोअरिंग आणि विहिरींवर मुक्काम करावा लागत आहे. रात्री 8 ते 9 वाजता बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी नंबर लावल्यानंतर पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान हंडा भरला जात आहे.
पाणीटंचाईग्रस्त ही गावे वाडा शहरापासून तीन ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप या गावांसाठी पाण्याचे टँकर सुरू केले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.