
मुंबईतील पाणीटंचाई आणि गढूळ पाणीपुरवठय़ाविरोधात शिवसेनेने आज परळ, वरळी, जे.जे., ग्रँटरोड, घाटकोपरमध्ये पालिका कार्यालयांवर जोरदार मोर्चा काढून पालिका प्रशासनाला जाब विचारला. ‘पाणी पाणी, हीच आहे का आणीबाणी’, ‘लबाडांनो पाणी द्या! पाणी द्या, पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देत शिवसैनिकांचे मोर्चे पुढे निघाले असताना पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चे अडवले. मात्र, तरीही मुंबईकरांच्या हक्काच्या पाणीप्रश्नाचे निवेदन संबंधित वॉर्ड ऑफिरसला देत मुंबईकरांचा पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी शिवसेनेने केली.
मुंबईत काही भागांत गेल्या दीड महिन्यापासून, तर काही भागांत गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई असून काही भागांमध्ये गढूळ पाण्याची समस्या आहे. त्या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन मुंबईची पाणी समस्या तातडीने सोडवा, नाहीतर महापालिकेच्या सर्व कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही महापालिकेला जाग न आल्यामुळे शिवसेनेकडून महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर शिवसेनेकडून धडक हंडा मोर्चे काढले जात आहेत.
जे. जे. मार्ग, ग्रँट रोडमध्ये शिवसेना आक्रमक
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने दूषित पाणी, कमी दाबाचे पाणी, त्याचप्रमाणे रस्त्यांची अपूर्ण कामे, कचऱ्यावरील कर या सगळ्याच्या विरोधात मुंबई महापालिका जे. जे. मार्ग परिसरातील बी आणि ग्रँट रोडमधील डी वार्ड कार्यालयावर आज मोर्चा काढून पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील सर्व महिला-पुरुष, युवासेनेचे पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
परळ, भोईवाडा, काळाचौकीत कृत्रिम पाणीटंचाई
शिवसेना शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली परळच्या एफ-दक्षिण पालिका कार्यालयावर जोरदार हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ज्येष्ठ महिलाही सहभागी झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. मुंबई महापालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून परळ, लालबाग, भोईवाडा, काळाचौकी या परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली गेली असून सर्वसामान्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे, असा आरोप अजय चौधरी यांनी केला. यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, किरण तावडे, बैजू हिंदोळे, जयसिंह भोसले, विजय इंदुलकर, शिवडी विधानसभा समन्वयक गौरी चौधरी, लता रहाटे, रूपाली चांदे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
घाटकोपरमध्ये शिवसैनिक पालिकेवर धडकले
घाटकोपर पूर्व व पश्चिम विभागात होणारा दूषित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी, अघोषित पाणीकपात अशा पाणीसमस्या त्याचबरोबर अपूर्ण नालेसफाई, रस्तेदुरुस्ती, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा तसेच प्रस्तावित कचरा कराविरोधात ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 च्या वतीने विभागप्रमुख तुकाराम पाटील आणि विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पूर्व येथील महापालिकेच्या ’एन’ विभाग कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागप्रमुख सुनील मोरे, विलास पवार, विजय पडवळ, चंद्रपाल चंदेलिया, विधानसभाप्रमुख सुभाष पवार, अवी राऊत, संजय चव्हाण, माजी नगरसेविका स्नेहल मोरे, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, शिक्षक संघटना सचिव सचिन भांगे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वरळीत पाण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
पाणी समस्येविरोधात जी-दक्षिण विभाग कार्यालयावर आज शिवसेनेने हंडा मोर्चा काढला. पोलिसांनी दोन दिवस आधीच वरळी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, आज मोर्चाला मोठय़ा संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावली. शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या पुढाकाराने मोर्चाला प्रारंभ झाला. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करताच लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसेना शिष्टमंडळाला जी-दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांना निवेदन देण्याची परवानगी दिली. आंदोलनात माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, स्नेहल आंबेकर, विधानसभा संघटक निरंजन नलावडे, उपविभागप्रमुख हरीश वरळीकर, राम साळगावकर, अनुपमा परब, शाखाप्रमुख बाबू कोळी, जिवाबा केसरकर, विजय भणगे, रामकृष्ण शिंदे, दीपक बागवे, गोपाळ खाडे, युवासेना विभाग अधिकारी संकेत सावंत, आकर्षिका पाटील, अभिजित पाटील सहभागी झाले होते.