
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे बांधा अशा योजना सरकार आखते या योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या जलसंधारण विभागाने तेरा उपविभागीय अभियंत्यांना प्रशिक्षणही दिले. पण प्रत्यक्षात कामावर नियुक्ती करण्याऐवजी या उमेदवारांना बिनपगारी बसवून ठेवले आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ सांगणारे जलसंधारण खाते आम्हाला खात्यात कधी ‘जिरवून’ घेणार असा सवाल अभियंते विचारत आहेत.
राज्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी राज्याच्या जलसंधारण विभागाच्यावतीने जमीनीची धूप थांबवणे, छोटे बंधारे बांधणे, नद्यांमधील गाळ काढणे, पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे असे उपाय योजले जातात या कामांसाठी जलसंधारण विभागाने राज्य लोकसेवा आयोगामार्फत तेरा उपविभागीय अभियंत्यांची भरती केली. त्यानंतर त्यांना संभाजीनगरमधील ‘वाँटर अँड लँड मॅनेजमेंट इस्टिटय़ूट’ अर्थात ‘वाल्की’मध्ये 1 जानेवारी ते 27 मेपर्यत प्रशिक्षण दिले. या काळात त्यांना पगारही दिला. पण त्यांचे काम थांबवले. पगारही बंद झाला. सध्या हे अभियंते संभाजीनगरमधील ‘वाल्की’ संस्थेतच मुक्कामाला आहे. यांचा राहाण्याचा व जेवणाचा खर्च संस्थेच्यावतीने करण्यात येतो पण आता या अभियंत्यांकडे राहाण्याचा व जेवणाचा खर्च मागितला आहे. 27 मे पासून पगार नाही आणि कामही नाही अशा परिस्थिती राहाण्याचे पैसे कसे भरणार असा सवाल हे अभियंते विचारत आहेत.
या अभियंत्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पण पुढे पोस्टिंग दिलेले नाही. त्यांच्या पोस्टिंगच्या प्रस्तावाची फाईल सचिव-उपसचिवांमार्फत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे पडून आहे. पण त्यावर अजून निर्णयच घेतलेला नाही. मात्र दुसरीकडे जुन्या कर्मचाऱयांची या ठिकाणी पोस्टिंग करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या तेरा अभियंत्यांमध्ये अस्वस्थता आहे.