मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व वॉर्डमधील जोगेश्वरी पूर्वमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांशी सर्वच भागांत पाण्याची अक्षरशः बोंबाबोंब सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत के/पूर्व वॉर्ड प्रशासन आणि प्रमुख जल अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
जोगेश्वरी पूर्व भागातील न्यू शामनगर, कोकण नगर, सर्वोदय नगर, मेघवाडी, संजय नगर, गोणी नगर, पी.एम.जी.पी वसाहत, म्हाडा कॉलनी, शिव टेकडी, आनंद नगर, अग्रवाल नगर, प्रताप नगर, स्मशान टेकडी, चाचा नगर, फ्रान्सिस वाडी, मकरानी पाडा, सुभाष नगर आदी भागांत पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या भागात पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत शिवसेना माजी नगरसेवक बाळा नर यांनी जल विभागाच्या प्रमुख अधिकाऱयांसह प्रमुख जलअभियंता माळवदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र दोन महिने उलटले तरी जोगेश्वरीकरांच्या पाणीप्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाळा नर यांनी आता थेट पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडेच या प्रश्नासाठी धाव घेतली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन जोगेश्वरीकरांचा पाणीप्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व विभागांत आढावा घेण्यात आला. या वेळी बाळा साटम उपविभागप्रमुख आणि शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर, अंकुश मोर्वेकर, उपशाखाप्रमुख तुषार सावंत, शरद चव्हाण, अरविंद छेडा, गजानन सावंत, शांताराम साळुंखे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.