
सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत 21 हजार 322 क्युसेक्स विसर्गाने पाणी येत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची टक्केवारी 42.09% पर्यंत पोहोचली आहे .पुणे जिल्ह्यात मावळ भागात व लोणावळा परिसरात होत असलेल्या पावसामुळे पानशेत धरणातून सोमवारी सकाळी 9 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुठा नदीवर असलेल्या खडकवासला धरणातून सोमवारी दुपारी 22 हजार 880क्युसेक्स विसर्गाने पाणी खाली सोडण्यात येत आहे. यामुळे बंडगार्डन पुणे येथून सायंकाळी 25 हजार 218 क्युसेक्सने पाणी दौंड भीमा नदीत येत आहे.
या येणाऱ्या पाण्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपर्यंत उजनी धरणात 25 हजार क्युसेक्स विसर्गाने तर मंगळवार 30 जुलै रोजी सकाळी 30 हजार क्युसेक्सपर्यंत उजनीत पाणी येण्याची शक्यता असल्याचे धरण नियंत्रण विभागाने कळवले आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत उजनी जलाशयात 50टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा होणार आहे. पाण्याची आवक सुरुच राहणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे. सोमवार सायंकाळी उजनी मध्ये 86.21 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. परंतु दौंड इथून येणाऱ्या विसर्गात वाढ होत असल्यामुळे मंगळवारी सायंकाळ पर्यंत उजनीत 90 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.