दिल्लीतील वीज कंपन्या अदानींच्या घशात घालण्याचा डाव, अरविंद केजरीवाल यांचा मोदी सरकारवर घणाघात

दिल्लीतील वीज कंपन्या अदानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव असून त्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर दिल्लीतील विधानसभेत केला.

मी जेव्हा दिल्लीचा मुख्यमंत्री होतो तेव्हा दिल्लीतील सर्व वीज कंपन्या गौतम अदानींच्या घशात घालण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. परंतु, मी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. कदाचित त्यामुळेच मला तुरुंगात टाकले गेले असेल, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. उद्या जर भाजपचे दिल्लीत राज्य आले तर ते अदानीला दिल्लीतील वीज कंपन्या देणार नाहीत हे आधी त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही केजरीवाल यांनी मोदी सरकारला दिले.

गुजरातमध्ये वीज महाग केली

अदानी समुहावर महागडी वीज देण्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. गुजरातमध्ये 2021 मध्ये 2.83 रुपये युनिट वीज दर होता. वर्षभरात म्हणजेच 2022 मध्ये हा दर 8.83 रुपये करण्यात आला. तिकडे भाजपा सरकार असल्यामुळे वीज कंपन्या त्यांच्या ताब्यात आल्या आणि त्यांनी वीज महाग केली, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

…तर दिल्लीकर वीज बिल भरू शकले नसते

मोदी सरकारने दबाव आणल्यानंतर जर मी दिल्लीतील वीज कंपन्या अदानींना सोपवल्या असत्या तर दिल्लीकर वीज बिल भरू शकले नसते, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत वीज इतकी महाग झाली असती की सरकार त्यांना सबसिडी देऊ शकली नसती आणि तुम्ही तुमच्या कमाईतून वीज बिल भरू शकला नसता, याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले.