
हिंदुस्थानी नौदलातून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीच्या तळाशी स्थिरावणार आहे. ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग खाडीत आणून शास्त्राrय पद्धतीने युद्धनौकेची साफसफाई करून विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल. समुद्राच्या तळाशी युद्धनौका स्थिर केल्यावर स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यटकांना युद्धनौका जवळून बघता येईल. नजिकच्या भविष्यात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने चार पाणबुडय़ा विकत घेण्यात येणार आहेत. पाणबुडीतून समुद्रतळ आणि युद्धनौकाही दिसेल अशी योजना आहे.
मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी हिंदुस्थानी नौदलाची ‘गुलदार’ ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती. नौदलामध्ये चाळीस वर्षे सेवा बजावल्यानंतर ही युद्धनौका सेवेतून निवृत्त झाली आहे. कारवारमधील नौदलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात नौदलाच्या वतीने आज या युद्धनौकेची कागदपत्रे पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात दिली. त्यामुळे संरक्षण दलातून गुलदारचे महाराष्ट्र राज्याकडे आज अधिपृतपणे हस्तांतरण झाले आहे.
विजयदुर्ग परिसरात हा प्रकल्प का?
सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघोटण खाडी निश्चित करण्यात आली होती. ही खाडी सुमारे 42 किलोमीटर लांब आणि 40 ते 50 मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ-वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षितता असल्याने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.