छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणाऱ्या मिंधेंचे आमदार भरत गोगावले यांच्या ‘चिंधीचोर’ गुंडांवर कारवाई करा, अन्यथा 5 जानेवारी रोजी माणगावात होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उधळवून लावू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने देताच खोके सरकारची चांगलीच गाळण उडाली आहे. पोलिसांना पुढे करून शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल करण्यास भाग पाडले असून रायगडच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी 70 ते 80 जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व शिवसैनिकांना चौकशीसाठी अलिबागमध्ये हजर राहण्याचे आदेश देतानाच 20 हजारांचा जामीन देण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांच्या आडून कारवाईचा ससेमिरा मागे लावत दडपशाही करणाऱ्या मिंध्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
मिंध्यांचे नॅपकीनवाले आमदार भरत गोगावले यांनी नागपूर येथील अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. महाडमधील शिवसैनिकांनी याविरोधात 22 डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले, मात्र मिंध्यांच्या गुंडांनी पोलिसांच्या आडून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेच्या नावाखाली केलेल्या या दंडेलीची स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा 5 जानेवारी रोजी लोणेरे येथे होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उधळवून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला होता. याचा चांगलाच धसका सरकारने घेतला असून महाड विधानसभा मतदारसंघातील 70 ते 80 शिवसैनिकांना कारणे दाखवा नोटिसा रायगडच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी बजावल्या आहेत. या नोटिसा बजावत आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. नोटिसा बजावलेल्या शिवसैनिकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहेत. मात्र प्रशासनाच्या आडून कितीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी व शहरप्रमुख अजित तारलेकर यांनी दिला.
आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कराल तर खबरदार
विकास गोगावले खुलेआम चिथावणी देत आहेत. महाडमधील आंदोलनाच्या वेळीही ते पोलिसांच्या आडून हुल्लडबाजी करत होते, मात्र आजतागायत त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल नवगणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 5 जानेवारी रोजी आम्ही ठरलेले आंदोलन शांततेच्या मार्गानेच करून मुख्यमंत्र्यांचा निषेध करणार आहोत. परंतु काही गुंडांकरवी शिवसैनिकांवर हल्ल्याचा डाव आखला जात आहे. पण असे कराल तर खबरदार, जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही नवगणे यांनी दिला आहे.
अन्यथा शिवसैनिक इंगा दाखवतील
शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा इशारा देणाऱ्या शिवसैनिकांना नोटिसा पाठवून सरकार दडपशाही करत आहे. महाडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलिसांना पाठवून मानसिक त्रास दिला जात आहे. आमदार भरत गोगावले व त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या इशाऱ्यावरूनच पोलीस ही कारवाई करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी केला. मात्र कितीही दडपशाही करा, छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मुख्यमंत्र्यांना मागावीच लागेल. अन्यथा 5 जानेवारीला शिवसैनिक आपला इंगा दाखवतील, असा इशाराच त्यांनी दिला.