
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनादरम्यान पोलीस व आंदोलकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली व काही गाड्याही जाळल्या. यात पोलिसांच्या व्हॅनचाही समावेश आहे.
मुर्शिदाबाद जंगपूरी येथील महत्त्वाचे रस्ते या आंदोलकांनी अडवले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा खोळंबा झाला होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
देशभरात अधिसूचना जारी
संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील त्यावर स्वाक्षऱी केली आहे. आज केंद्र सरकारने देशभरात या कायद्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे आता देशात सुधारित वक्फ कायदा लागू झाला आहे.
कायद्याविरोधात देशभरातून एकूण 15 याचिका
या कायद्याविरोधात देशभरातून एकूण 15 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये अनेक पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्यासह डीएमकेनेही कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याशिवाय राष्ट्रीय जनता दलानेही सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. एमायएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, मणिपूरचे आमदार शेक नुरूल हसनही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत.