Waqf Act 2025 – पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही; ममता बॅनर्जींची घोषणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारचा वक्फ सुधारणा कायदा, 2025 हा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. कोलकातामधील जैन समाजाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मी अल्पसंख्याक आणि त्यांच्या मालमत्तेला धक्का लागू देणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी बोलत होत्या.

वक्फ सुधारणा कायदा लागू झाल्याने तुम्ही दुःखी आहात. मात्र, विश्वास ठेवा… बंगालमध्ये असे काही होणार नाही, जिथे समाजात फूट पाडून कोणी राज्य करणार नाही. सर्वांनी एकजुटीने राहायचं आहे. जगा आणि जगू द्या. बांगलादेशची स्थिती बघा. हा कायदा आता मंजूर करायला नको होता. आपण जिओ और जिने दो चा संदेश दिला पाहिजे. बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षा देणं माझं काम आहे. सर्वांना माझं आवाहन आहे, तुम्हाला कोणीही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यासाठी चिथावत असेल तर, कृपया असं करू नका. लक्षात ठेवा, दीदी तुमची आणि तुमच्या संपत्तीचे रक्षण करेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

वक्फ कायदा लागू; पश्चिम बंगालमध्ये उद्रेक; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

“तुम्ही गोळ्या घालून मला ठार केलं तरी…”

तुम्ही गोळ्या घालून मला ठार केलं तरी एकतेत फूट पडू देणार नाही. बंगालमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. त्या सर्वांना प्रेम, शांतता आणि मानवता हवी आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. त्याने अस्वस्थ होण्याची गरज नाही. धर्माच्या आधारावर बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.