‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देऊन समाजात भयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी निवडणूक संपताच वक्फ बोर्डाची तिजोरी भरून टाकली आहे. सत्तेचा घोळ कायम असतानाही वक्फ बोर्डाला मात्र पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले 10 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप तसेच मिंध्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ असा विषारी प्रचार करून समाजात हिंदू-मुस्लिम अशी फाळणी केली होती. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सर्व सभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणा दिल्या होत्या. भाजप आणि मिंधे हे कसे कट्टर हिंदुत्ववादी आहेत असे भासवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र निवडणूक होताच भाजप आणि मिंध्यांचे हिंदुत्वाचे सोवळे गळून पडले आहे.
काळजीवाहू सरकारने भरली वक्फ बोर्डाची तिजोरी
महाराष्ट्रात सध्या मिंध्यांचे काळजीवाहू सरकार आहे. या सरकारला अर्थविषयक कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. असे असतानाही अर्थसंकल्पात वक्फ बोर्डाला मंजूर केलेल्या 20 कोटींपैकी 10 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला अदा करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील शासकीय अध्यादेश 28 नोव्हेंबर रोजी काढला आहे.