
वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार असून विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला आहे. तर एनडीएला बोलण्यासाठी 4 तास 40 मिनिटांचा वेळ मिळाला असून विरोधकांना मिळून एकूण केवळ 4 तासांचा वेळ देण्यात आला आहे. बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीने याबाबतची माहिती दिली. विरोधकांनी याप्रकरणी चर्चेसाठी 12 तासांचा वेळ देण्याची मागणी केली. परंतु, ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी बीएसीच्या बैठकीवर बहिष्कार घातला आणि सभात्याग केला.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयकावर चर्चा करण्यासाठीचा वेळ वाढवला जाऊ शकतो. त्यानंतर विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात येईल, असे सांगितले. परंतु, विरोधकांचे सरकारने ऐकून घेतले नाही, असा आरोप करत बैठकीवर बहिष्कार घालण्यात आल्याचे काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सांगितले. सरकार आपला अजेंडा देशावर लादत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विधेयकाबाबत अशा आहेत सूचना
वक्फ सुधारणा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये. जुन्या मशिदी, दर्गे किंवा मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ यांच्याशी कुठल्याही प्रकारची छेडछाड केली जाणार नाही. जमीन हा राज्यांचा विषय आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या जमिनींबद्दल राज्यांशीही सल्लामसलत केली जावी, अशा सूचना टीडीपी आणि जदयूने मोदी सरकारला केल्या आहेत.
भाजपाचा प्रत्येक निर्णय मतांसाठी
भाजपचा प्रत्येक निर्णय मतांसाठी असतो. समाजवादी पार्टी या विधेयकाच्या विरोधात आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील संस्कृती आणि बंधुभाव यांमध्ये खोल दरी निर्माण होऊ शकते. भाजपाकडून तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. तर हे विधेयक केवळ एका धर्माला टार्गेट करण्यासाठी आणले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे खासदार या विधेयकाला विरोध करतील असे, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
टीडीपीचा पाठिंबा तर नितीश कुमार यांची अट
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीने वक्फ विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. उद्या लोकसभेत विधेयक सादर झाल्यानंतर आम्ही याबद्दल प्रतिक्रिया देऊ असे टीडीपीचे राष्ट्रीय प्रवत्ते प्रेम कुमार म्हणाले. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ नये अशी आमची इच्छा असून सरकार नक्कीच याचा विचार करेल अशी आशा व्यक्त केली. नितीश कुमार राजकारणात आल्यापासून त्यांनी आपली धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा ठेवली आहे. काही दिवसांपूर्वीच मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ नितीश कुमार यांना येऊन भेटले, अशी माहिती पक्षाचे नेते राजीव रंजन यांनी दिली. त्यामुळे या विधेयकावरून नितीश कुमार यांची गोची झाल्याचे चित्र आहे.
इंडिया आघाडी पूर्ण क्षमतेने विरोध करणार
वक्फ विधेयकावरील चर्चेत सक्रीय सहभाग घेण्यात येईल, परंतु, या विधेयकाला इंडिया आघाडी पूर्ण क्षमतेने विरोध करेल असा निर्णय आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आरएसपीचे नेते एनके प्रेमाचंद्रन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. हे विधेयकच घटनाबाह्य असल्यावर आज झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ते म्हणाले.