
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आज मांडण्यात आले. त्यावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. या चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या मुद्द्यावरून केंद्रातील एनडीए सरकारला घेरलं. अखिलेश यादव यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला.
आपलं अपयश झाकण्यासाठी सरकारने हे विधेयक आणल्याचा हल्लाबोल अखिलेश यादव यांनी केला. सरकारचा डोळा वक्फच्या जमिनींवर आहे. पण वक्फच्या जमीनपेक्षाही मोठा मुद्दा हा देशाच्या त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने कब्जा करून गावं वसवलं आहे, असा घणाघात अखिलेश यादव यांनी केला.
हे अपयशांचं विधेयक आहे. या सरकारने नोटबंदीचाही निर्णय घेतला होता. पण अजूनही जुन्या नोटा बाहेर येत आहेत. हे अपयश शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरचंही आहे. महागाईच्या मुद्द्यावरही सरकार अपयशी आहे. गंगा स्वच्छ झाली का? स्मार्ट सिटी झाली का? यावेळी अपयशाचा पडदा हा वक्फ विधेयकाला बनवलं आहे. ज्यांच्यासाठी हा निर्णय होणार आहे त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केलं जातंय. भाजप जेव्हा कधी विधेयक आणतं ते आपलं अपयश झाकण्यासाठीच, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.
महाकुंभमध्ये अनेकांचा जीव गेला. इथेही सरकार आपलं अपयश झाकत आहे. कुंभमध्ये ज्यांच्या मृत्यू झाला त्यांची माहिती सरकारने द्यावी. जे 1 हजार हिंदू गायब झाले त्यांच्याबद्दल सरकारने बोलावं. धर्माच्या मुद्द्यावर व्यवहार होऊ शकत नाही. कुंभ ही काही व्यवहार करण्याची जागा आहे का? असा सवाल उपस्थित करत अखिलेश यादव यांनी निशाणा साधला.