
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत या विधेयकाला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले. दुपारी एक वाजता हे विधेयक मांडले गेले. त्यानंतर वादळी चर्चा आणि गदारोळ पाहायला मिळाला. मध्यरात्रीनंतरही चर्चा सुरू होती. दरम्यान, वक्फ विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन सुरू झाले असून आजही संतप्त निदर्शने झाली तर लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमारांच्या जदयूचे नेते कासीम अन्सारी यांनी निषेध नोंदवत पक्षाला रामराम ठोकला.
चर्चा सुरू असताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपच्या नेत्यांनी राम मंदिराच्या नावावर वर्गणी मागितली आणि त्यात घोटाळा केला, असा आरोप केला. भाजपच्या खासदार चंचा चोर असे ते म्हणाले. यावरून सभागृहात एकच गदारोळ उडाला. यानंतर राज्यसभा सभापतींनी संजय सिंह यांचे आक्षेपार्ह विधान कामकाजातून काढून टाकले. दुपारी एक वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही यूपीए सरकारच्या तुलनेत या विधेयकाला अधिक गांभीर्याने घेतले आहे. हा विषय राजकीय पक्षांचा नसून राष्ट्रीय आहे, त्यामुळे या विषयावर चर्चा झाली पाहिजे. विधेयकात कुंभमेळा, बिहारची निवडणूक, एअर इंडिया तर केरळमधील सिनेमा असे विषय येत आहेत. चर्चेला भरकटवू नये असे आवाहन नड्डा यांनी केले.
माझ्याकडे एक इंचही जमीन नाही – खरगे
अनुराग ठाकूर यांचे आरोप फेटाळतानाच माझ्याकडे एक इंचही जमीन नाही. जमीन हडपल्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असे उत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत दिले.जर भाजपचे लोक मला घाबरवून झुकवू पाहत असतील तर मी कधीच झुकणार नाही. मी मोडेन, पण वाकणार नाही. लक्षात ठेवा घाबरवण्याने मी घाबरणारा नाही, असा इशारा खरगे यांनी ‘पुष्पा’ स्टाईलने सरकारला दिला.
लोकसभेत बुलडोझरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले, सोनिया गांधी यांनी तोफ डागली
लोकसभेत बुलडोझरद्वारे म्हणजेच सर्व विरोध डावलून आपला अजेंडा रेटत वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले, असा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला. हे विधेयक म्हणजे संविधानाचा अंत असून समाजात फूट पाडण्यासाठीची भाजप सरकारची रणनीती आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. मोदी सरकार देशाला रसातळाला नेत आहे. असेच सुरू राहिले तर संविधान केवळ कागदावरच राहील. संविधान उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.