Waqf Amendment Bill – विधेयकाविरोधात देशभरात निदर्शनं; मुंबई, अहमदाबाद, हैदराबादसह कोलकातामध्ये मुस्लिम संघटना रस्त्यावर

लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. पण दुसरीकडे या विधेयकाला तीव्र विरोध करत मुस्लिमांनी आज देशभरात निदर्शनं केली. मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकातासह देशात ठिकठिकाणी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली. रस्त्यावर उतरून मुस्लिमांनी विरोध केला.

कोलकातामध्ये पार्क सर्कल क्रॉसिंग येथे अल्पसंख्याक समाजाने विरोध करत निदर्शनं केली. वक्फ सुधारणा विधेयक 2025 तात्काळ मागे घ्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप देशाचं विभाजन करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

कर्नाटकच्या बेंगळुरूत, गुजरातच्या अहमदाबादमध्ये आणि तेलंगणात हैदराबादमध्येही विधेयकाविरोधात निदर्शनं करण्यात आली. विरोध आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जामिया भागात पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला. मुंबईत सुन्नी मशिदीत विधेयकाचा निषेध करण्यात आला. काळी फीत बांधून आणि घोषणात देत मुस्लिमांनी विरोध दर्शवला.