लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून भारतीय जनता पक्षाने 79 जागा लाटल्या असा धक्कादायक निष्कर्ष ‘वोट फॉर डेमोक्रसी’च्या अहवालात काढण्यात आला आहे. ही वाढलेली टक्केवारी संशयास्पद असून सुमारे पाच कोटी मतांचा घोटाळा झाला आहे, असे त्यात नमूद आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या अहवालाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. लोकसभेच्या एकुण 543 जागांपैकी 240 जागांवर भाजपचा विजय झाला. यापूर्वीच्या निवडणुका पाहता मतदानानंतर वाढलेली टक्केवारी 1 टक्केपेक्षा अधिक नव्हती. यावेळी मतदान झाल्यानंतर मोठय़ा विलंबाने पेंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली होती. त्यात वाढलेल्या मतांचे प्रमाण 3.2 ते 6.32 टक्के होते. आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील मतदानाची वाढ तर 12 टक्केपर्यंत गेली, असे अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानानंतर जाहीर केलेल्या टक्केवारीमुळे भाजप पुरस्कृत एनडीएला 79 जागांचा लाभ झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश आहे तर ओडिशा 18, पश्चिम बंगाल 10, आंध्र प्रदेश 7, कर्नाटक 6, छत्तीसगढ आणि राजस्थान राज्यात प्रत्येकी 5, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, तेलंगणा राज्यात प्रत्येकी 3, आसाम 2 तसेच गुजरात, केरळ आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी एका जागेचा लाभ झाला, असाही दावा अहवालात करण्यात आला आहे. या प्रकाशनप्रसंगी ‘वोट फॉर डेमोक्रसी’चे डॉल्फी डिसूजा, तिस्ता सेटलवाड तसेच ‘लोकमोर्चा’चे भारत पाटणकर आणि सतीश लोंधे उपस्थित होते.