
न्यू इंडिया सहकारी बँक 122 कोटींच्या अपहारप्रकरणी फरार असलेला अरुणाचलम उल्लहनाथन मारूथूवर ऊर्फ अरुणभाई हा आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शरण आला. त्याच्या अटकेने अटक आरोपीची संख्या सहा झाली आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवल्याने तो शरण आल्याचे सूत्रांनी सांगितले.
न्यू इंडिया सहकारी बँकेच्या 122 कोटींचा अपहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. पोलिसांनी तपास करून हितेश मेहता, धर्मेश पौंन, अभिमन्यू भोनला अटक केली होती. नुकतेच कपिल देढियाला आर्थिक गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या होत्या, तर अरुणभाईला फरार घोषित करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती. पोलिसांनी त्याच्यावर बक्षीसदेखील जाहीर केले होते. अखेर अरुणभाई हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शरण आला. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने हितेश मेहताकडून तीस कोटी घेतल्याचा आरोप आहे. अरुणभाई हा हितेशचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्या अटकेने काही बाबींचा खुलासा होणार आहे. अरुणभाईला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
- मनी लॉण्डरिंग कनेक्शन पोलीस तपासणार
- अरुणभाईने दिली दोघांना रक्कम, रक्कम घेणारे पोलिसांच्या रडारवर.
- अरुणभाई पंत्राटदार होता. 2013 मध्ये तो मेहताला प्रभादेवी येथे भेटला.
- गुन्हा दाखल झाल्यावर तो गुजरात, राजस्थान येथे गेला. त्यानंतर तो आंध्र प्रदेश येथे लपून बसला.
- पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कन्याकुमारी येथून पुणे येथे गेले. पुणे येथून ट्रेन पकडून तो मुंबईत आला. दादर स्थानकातून टॅक्सी पकडून तो पोलीस आयुक्त कार्यालयात आला.
- पोलिसांनी अरुणभाईची दोन बँक खाती गोठवली, आर्थिक अडचणीमुळे तो पोलिसांना शरण आला.