Walmik Karad मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच होता; चौकशीतून धक्कादायक खुलासा, अंबादास दानवेंचा दावा खरा ठरला

बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. त्यानंतर त्याला केजमधील न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या वाल्मीक कराड तुरुंगात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यापासून वाल्मीक कराडने पोलीस आणि सीआयडीला 23 दिवस गुंगारा दिला. या दिवसात तो नक्की कुठे होता याची माहिती आता समोर आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनातही गाजला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. एवढेच नाही तर सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा लावून धरला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही विधिमंडळात बोलताना वाल्मीक कराड नागपुरात असून एका फार्म हाऊसवर लपून बसल्याचा दावा केला होता.

अंबादास दानवे यांचा हा दावा आता आता खरा ठरला असून अधिवेशनात हा मुद्दा गाजत असताना वाल्मीक कराड नागपूरमध्येच होता, अशी माहिती आता समोर आली आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मीक कराडला आरोपी करण्याची मागणी होताच त्याने तिथून पळ काढला आणि त्याने पुणे गाठले.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून कराडची ओळख आहे. राजकीय वरदहस्तामुळे कराड सीआयडीला गुंगारा देत होता का? पुण्यात गेले काही दिवस मुक्कामाला असताना त्याला अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून, कराडला मोक्का लावण्याची मागणी जनतेतून होत आहे.