वाल्मीकच मास्टरमाइंड! खंडणीत अडथळा आणल्याने संतोष देशमुख यांची हत्या, अमानुष मारहाण करतानाचा व्हिडीओही मिळाला

मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. खंडणीला अडथळा आणला म्हणून कराड गँगने संतोष देशमुखांचा जीवच घेतल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान,  रणजित मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची नावे पुरावे नसल्याने  आरोपपत्रातून वगळली आहेत.

सुदर्शनच्या मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडीओ

संतोष देशमुख यांना जबर मारहाण करतानाचा एक व्हिडिओ जयराम चाटे याने सुदर्शन घुलेच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून व्हायरल केला. हा व्हिडीओही सीआयडीने न्यायालयासमोर ठेवला.

वाल्मीक कराड नंबर एकचा आरोपी, विष्णू चाटे नंबर दोनचा आरोपी, सुदर्शन घुले आरोपी नंबर तीन, प्रदीप घुले आरोपी नंबर चार, सुधीर सांगळे आरोपी नंबर पाच, महेश केदार आरोपी नंबर सहा, जयराम चाटे आरोपी नंबर सात, फरार असलेला कृष्णा आंधळे आरोपी नंबर आठ.