बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची तब्येत बिघडली आहे. पोटदुखीचा त्रास झाल्याने वाल्मीक कराडला बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अतिदक्षता विभागात वाल्मीकवर उपचार सुरू आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे. खुनाच्या कटात संशयित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाल्मीक कराडची कोठडी मागितलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने बुधवारी वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री वाल्मीकची तब्येत बिघडली.
जामीन अर्ज मागे
बीडमधील अवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मीक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्जावर आज केजच्या न्यायालयात सुनावणी होणार होती.
खंडणी प्रकरणातून हत्या
केज तालुक्यातील मस्साजोग गावात अवादा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाकडे वाल्मीक आणि त्याच्या गँगने दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यातील 50 लाख रूपये निवडणूक काळात दिले गेल्याचेही आ.सुरेश धस म्हणाले. तसेच उर्वरित रक्कमेची खंडणी मागण्याकरीता ज्यावेळी वाल्मीकची गँग गेली तिथेच सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषची हत्या झाल्याचे सांगितले जाते.
Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी आणि एसआयटीमार्फत केला जात आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड तब्बल 15 दिवसांनी पोलिसासमोर आला. त्यानंतर 14 दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याच्यावर खुनाच्या कटात संशय असल्याचे कलम आणि मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.