संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सात आरोपींवर आज मकोका लावण्यात आला. मात्र यातून वाल्मीकी कराड याचे नाव वगळण्यात आलं आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आहे का, असा प्रश्न संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा वाल्मीकी कराड असल्याने त्याला सहआरोपी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशीव शहरात शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, “या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला. मात्र यात वाल्मीकी कराड यावरही मकोका लागला पाहिजे.” ते म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड असून कॉल रेकॉर्ड तपासले तर, सर्व गोष्टी समोर येतील. यातच एकीकडे कारवाई होत सुरू असताना दुसरीकडे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, असं ते म्हणाले.