पुण्यातील सीआयडी कार्यालयात ज्या आलिशान गाडीतून वाल्मीक कराड शरण आला तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मस्साजोग दौऱ्याच्या ताफ्यातही होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींना बीड येथे न ठेवता छत्रपती संभाजीनगर पिंवा नाशिक येथे हलवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्हय़ातील आरोपी वाल्मीक कराड हा 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मीक कराड एम.एच. 23 बीजे 2231 या क्रमांकाच्या आलिशान स्कॉर्पिओ गाडीतून सीआयडी कार्यालयात आला ती गाडी परळी येथील अजित शिवलिंग मोराळे यांची असून शिवलिंग मोराळे हे शासकीय पंत्राटदार आहेत. मोराळे बापलेक धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल आक्षेप नाही तर काही कर्मचाऱ्यांबद्दल आक्षेप असल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. या प्रकरणातील आरोपींना बीडमध्ये न ठेवता छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात पिंवा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
16 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूर अधिवेशन संपताच मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्या ताफ्यातही हीच गाडी होती, असा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी केला.
सीआयडीने तपासाचा लेखाजोखा मांडावा, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी
बीड जिल्हय़ात वेगवेगळय़ा क्षेत्रांत गुंडांच्या टोळय़ा कार्यरत आहेत. या गुंडांच्या माध्यमातूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदान करून घेण्यात आले. प्रशासनही या गुंडांसमोर हतबल आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासाचा लेखाजोखा माध्यमांसमोर मांडलाच पाहिजे. आरोपींचे किती बँक खाती गोठवण्यात आली, गोठवण्यात आलेल्या खात्यांमध्ये किती पैसे होते आणि हे पैसे कोठून आले? असा प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. शरणागतीच्या वेळी वापरण्यात आलेली गाडी अजित पवारांच्या मस्साजोग दौऱ्यातही होती, असेही ते म्हणाले. वाल्मीक कराड पुण्यात होता. पण पोलीस, सीआयडी, गुप्तचरांना तो दिसला नाही हे आश्चर्यच आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोव्यात तो फिरला. तेथून तो पुण्यात आला. एवढय़ा प्रवासात तो एकटा नक्कीच नव्हता. मग त्याच्याबरोबर कोण होते? पोलिसांनी हे सत्य जनतेसमोर आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.
उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली. या खटल्यात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याबाबतचे निवेदन धस यांनी मला दिले आहे. त्यानंतर मी उज्ज्वल निकम यांना पह्न करून खटला चालवण्याची विनंती केली आहे. त्यांनी एक-दोन दिवसांची मुदत मागितली आहे. कारण त्यांच्याकडे सध्या इतर खटल्यांचे काम सुरू आहे. बीडच्या केसमध्ये अधिक वेळ द्यावा लागणार आहे. सध्याच्या केसेसचा आढावा घेऊन ते त्यांचा निर्णय कळवणार आहेत. उज्ज्वल निकम यांनी होकार दिला तर निश्चितपणे त्यांची या खटल्यात नियुक्ती केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉण्टेड!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चौघांना अटक केली. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्हय़ातील आरोपी वाल्मीक कराड हा पुण्यात शरण आला. उर्वरित तिघे सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा श्यामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे या तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले. पण हे तिघे अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे आज या तिघांना फरार घोषित केले. हे तीनही आरोपी कोणाला आढळल्यास पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीआयडीचे पथक केजच्या विश्रामगृहावर तळ ठोकून असून आज सुदर्शन घुलेच्या दोन भावांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – प्रकाश सोळंके
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आम्ही हीच मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
ते पलंग पोलिसांसाठी – फडणवीस
आरोपी वाल्मिक कराड याचे लाड पुरवण्यासाठी बीड पोलिस स्टेशनमध्ये चार ते पाच पलंग आणल्याचा आरोप होत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. तपासासाठी बीड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली आहे. त्यांना काय जमिनीवर झोपवणार का? ते पलंग तपासासाठी आलेल्या पोलिसांसाठी आणले आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे.
खटला बीड जिह्याबाहेर चालवावा –दानवे
संतोष देशमुख हत्या खटला बीड जिह्याबाहेर चालवण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड याची बीड जिह्यामध्ये दहशत आहे. त्याचप्रमाणे सरकारमधील एक मंत्री त्याच्या जवळचे आहेत. त्यामुळे तो जिह्याबाहेर चालवला गेला पाहिजे, असे दानवे म्हणाले. वाल्मीक कराड याचा खटला चालविण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी नकार का दिला याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये काय आहे, कोणाचे पह्न आले याचे सीडीआर जाहीर करावे. यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा असणारे यात आरोपी झाले पाहिजेत ‘त्या’ तीन तासांत काय झाले झाले ते बाहेर येण्याची आवश्यकता अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
बीड प्रकरणात मी राजीनामा का द्यावा?
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप होत आहेत. आपण राजीनामा देणार का, असे विचारले असता, या प्रकरणात मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कोणत्या अर्थाने संबंध आहे, त्यामुळे मी राजीनामा का द्यावा? उगाच आऊचा बाऊ का करता, असा प्रतिसवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकारांनाच केला. हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा ही माझी मागणी आहे. मी मंत्री असल्याने त्या तपासावर प्रभाव होऊच शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.