वाल्मीक कराडची B टीम बीडमध्ये सक्रिय; धनंजय देशमुख यांचा आरोप, रोख कुणाकडे?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 9 फेब्रुवारी रोजी दोन महिने पूर्ण झाले. याप्रकरणी वाल्मीक कराडसह अन्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण अद्यापही या हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रमुख आरोपींपैकी एक कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केलेली असतानाच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीडमध्ये वाल्मीक कराडची बी टीम सक्रिय असून त्यांच्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडमधील पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. या प्रकरणी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. आता धनंजय देशमुख यांनीही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

बीडमध्ये आरोपींची बी टीम सक्रिय आहे. या बी टीमने विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांना फरार होण्यासाठी मदत केली. आरोपींना गाडी, पैसे पुरवण्याचे कामही या टीमने केले. मात्र त्यांच्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

बी टीम नक्की कोण?

बीड पोलीस आणि सीआयडीकडून वाल्मीक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांना फरार होण्यासाठी मदत करण्यांची चौकशी झाली होती. मात्र त्यांचा या हत्याकांडात थेट संबंध आढळून आला नव्हता, असे सीआयडीने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम नक्की कोण? त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा सवाल उपस्थित होत आहे.

माजी मंत्र्याचा मुलगा तीन तासांत सापडतो, पण कृष्णा आंधळे का सापडत नाही? बीडच्या जनतेचा संतप्त सवाल