बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. त्यानंतर रात्रीच त्याला केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याच दरम्यान वाल्मीक असलेल्या बीडच्या पोलीस स्थानकात 5 नवीन पलंग मागवण्यात आल्याची चर्चा रंगली. यावरुन रोहित पवार यांच्यानंतर आता आमदार विजय वडेट्टीवार यांनीही महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्स (ट्विटर) वरून केला. वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
वाल्मीक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला! मस्साजोग गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
कराड वर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असेही वडेट्टीवार पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
दरम्यान, विरोधकांनी हल्ला चढवल्यानंतर प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हे नवीन पलंग पोलीस स्थानकातील स्टाफसाठी मागवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पलंग मागवण्याच्या टायमिंगवर सवाल उपस्थित होत आहेत.