मोदी सरकार जागे व्हा, विश्वगुरू जागे व्हा; बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय, अत्याचाराविरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन

बांगलादेशातील इस्कॉन या मानवतावादी, आध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात बांगलादेश सरकार अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बालगंधर्व चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी बांगलादेश मुर्दाबाद.., हिंदुंवरील अत्याचार थांबलेच पाहिजे.., जागे व्हा, जागे व्हा मोदी सरकार जागे व्हा.., विश्वगुरू जागे व्हा.., मोदी सरकारची लाडकी बहीण, शेख हसीना…शेख हसीना यासारख्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच संतप्त शिवसैनिक बांगलादेशाचा झेंडा पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करत असताना पोलिसांनी शिवसैनिकांना रोखत झेंडा आपल्या ताब्यात घेतला.

हिंदुस्थानीयांवर बाहेर देशांमधील वाढते अत्याचार, हल्ले थांबवण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. बांगलादेशी हिंदूंविरोधातील अत्याचार थांबले नाही तर शिवसेना पुणे शहरात विविध ठिकाणी उग्र आंदोलन करणार आणि झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करेल, असा इशारा देत बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत बांगलादेशासोबत क्रिकेट बंद करा ही शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मागणी अमलात आनावी, अशी मागणी शहरप्रमुख संजय मोरे यांनी यावेळी केली. शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात पुढील दहा दिवस हे धरणे आंदोलन सुरू राहिल असेही त्यांनी सांगितले.

बांगलादेशात तुमची रेंज नाकी का?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना केंद्र सरकार झोपले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतŠला विश्व गुरु म्हणवतात. ते जर रशिया, युक्रेनचे युद्ध एका फोनवर थांबवले असे म्हणत असतील तर मग मोदी बांगलादेशमध्ये फोन का लावत नाहीत? त्या ठिकाणी त्यांची रेंज नाही का? असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला.