कोल्हापूर प्राधिकरण कार्यालयाला सीईओंची प्रतीक्षा, मनमानी कारभार, सतत सुट्टी, रजेने नागरिकांना हेलपाटे

शहरालगतच्या गावांना बांधकाम परवाने सुरळीत मिळावे, यासाठी खास कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, आठवड्यातील पाच दिवसांच्या कामामुळे आणि लागून आलेल्या सुट्ट्या, अघोषित रजांमुळे अधिकाऱ्यांविना नागरिकांनी गजबजणारे कार्यालय आता त्यांचे बॉस सीईओ संजयकुमार चव्हाण यांच्याही प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. कार्यालयीन वेळेतही त्यांचा स्विच ऑफ असलेला फोन आणि सहायकाच्या फोनवरून त्यांच्याशी कामासाठी करावा लागणारा संपर्क अशा या अजब कारभारामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून फाईलवर कधी सही होईल, यासाठी दररोज नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या पाश्र्वभूमीवर शहरालगतच्या गावांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन २०१७ मध्ये कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. याचे कामकाज सन २०१८ पासून सुरू झाले. प्रारंभी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी खुर्चा इतर कार्यालयातून मागवाव्या लागत होत्या. यावर प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्र्यांमार्फत हे कार्यालय अद्ययावत करण्यात आले. उच्च दर्जाचे फर्निचर, सीईओंसाठी खास चेंबर आणि इतर सुविधांमुळे कामकाजात फरक पडेल असे वाटले. मात्र, कारभार सुधारण्याऐवजी लोकांसाठी त्रासदायक होऊ लागला. विविध पक्ष, संघटनांकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात आली; आंदोलने झाली. पण या कार्यालयातील अधिकाऱ्यांचा रुबाब मात्र अजूनही मालकाप्रमाणेच दिसून येतो आहे.

पाच दिवसांचा आठवडा करण्यात आल्याने आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे हे कार्यालय विशेष चर्चेत राहिले. सणावाराच्या सुट्ट्या, अघोषित रजा आणि कामावर असूनही सुट्टयांमुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहण्याबरोबरच ऑनलाइन कामाच्या नावाखाली केवळ वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी करत असल्याचे दिसून येऊ लागले. आता तर कार्यालयाचे प्रमुख असलेले सीईओ संजयकुमार चव्हाण हे त्यांचा फोन सातत्याने स्विच ऑफ करून ठेवत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ते रजेवर आहेत की त्यांनी सुट्टी घेतली आहे, याचा पत्ताही कर्मचाऱ्यांना नसतो. जर एखादा नागरिक त्रस्त झालाच तर त्यांच्या सहायकामार्फत चव्हाण यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन लावून त्यांच्याबरोबर बोलावे लागते. यावेळी ‘करून देतो’, ‘आज पाहतो’ एवढे सांगून चव्हाण हे वेळ मारून नेत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. एखादे ऑनलाइन काम पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना पंधरा ते वीस दिवस घ्यावे लागत आहेत. ; त्यातूनही काही तरी त्रुटी काढून पुन्हा हेलपाटे मारायला लावण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याचे विदारक चित्रही येथे दिसते. त्यात अधिकारी गायब असले तरी त्यांच्या टेबलवरील लाईट आणि फॅन मात्र अनावश्यक चालू असल्याने ही नाहक उधळपट्टी होत असल्याचेही दिसते.

गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ते वर्ष-दीड वर्षापासून हेलपाटे मारणारे आणि मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत अर्धा दिवसाचा वेळ वाया घालविणाऱ्या नागरिकांचा संताप अनावर होत आहे. यातून जनतेसाठी त्रासदायक ठरणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यांच्यासह त्यांच्या कार्यालयाच्या कारभाराची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राधिकरणात 42 गावांचा समावेश

कोल्हापूर शहराचे सध्याचे क्षेत्रफळ ६६.८२ चौरस किलोमीटर, तर ४२ गावांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाचे क्षेत्रफळ 345 चौरस किलोमीटर आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या ५ लाख ४९ हजार २३६, तर तर प्राधिकरणामध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये गावांची लोकसंख्या ९ लाख २० हजार इतकी आहे. प्राधिकरणातील गावे : करवीर तालुका : शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळीवडे गांधीनगर, चिंचवाड, मुडशिंगी, नवे वाडदे, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दु., भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, सादळे, मादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबा, उचगाव. हातकणंगले तालुका: टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली.