
अगोदर छगन भुजबळ आमच्याबद्दल बोलायचे, आता इतर काहीजणही बोलतात. भुजबळ आणि त्यांची भाषा एकच आहे. माझे फक्त उपोषण संपू द्या, एकेकाचा हिशेब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पाचव्यांदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली. अगोदर छगन भुजबळ बोलायचे, आता त्यात प्रवीण दरेकर यांची भर पडली आहे, असे ते म्हणाले.
चर्चेला या…
मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. हा विषय माध्यमात बोलण्यासारखा नाही. माध्यमात बोलून त्यावर मार्ग निघणार नाही. शंभुराज देसाई सरकार चालवतात. मी इकडे बोलायचे, त्यांनी तिकडे बोलायचे. त्यापेक्षा आंतरवालीत या, चर्चा करा आणि मार्ग काढा, असे आवाहन जरांगे यांनी केले.