
डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी एका 43 वर्षीय सराईत आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीविरोधात खंडणी, मारहाण, धमकावणे, जबरी चोरी अशा 15 हून अधिक गुह्यांची नोंद आहे.
26 वर्षीय डॉक्टरच्या दवाखान्यात आरोपी गेला आणि त्याने मोबाईलमध्ये डॉक्टरला त्यांचे अश्लील छायाचित्र दाखवले. मग त्यांची चित्रफित वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने डॉक्टरकडे खंडणीची मागणी केली. त्यामुळे डॉक्टरने घाबरून पैसे नसल्याचा बहाणा करून आरोपीला दीड हजार रुपये ऑनलाइन पाठवले, पण आरोपीचे त्यातून समाधान झाले नाही. त्याने दवाखान्यातून बाहेर पडताना डॉक्टरला पुन्हा धमकावले आणि उर्वरित पैसे लवकर देण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनंतर आरोपीने पुन्हा धमकावत डॉक्टरला त्यांचे अश्लील चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीने डॉक्टरकडे पाच लाखांची खंडणी मागितली. अखेर डॉक्टरने याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून आरोपी राजाला अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.