
>> सचिन जगताप/वसंत भोईर
विविध प्रकारच्या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे वाडावासीयांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असताना आता त्यात टायर कंपन्यांमधील ‘रबर पायरोलिसिस’ची भर पडली आहे. ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने तसेच सर्व नियम धाब्यावर बसवून होत असल्याने असंख्य गावकऱ्यांची फुप्फुसे निकामी झाली आहेत. त्यातील काही जणांना तर कॅन्सरचा धोका असून ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. कारखान्यांमधून निघणारा धूर व धुळीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेकांना त्वचारोग झाला असून नखेदेखील काळवंडली आहेत. वाडावासीयांच्या मुळावर उठलेल्या 11 गावांमधील 52 टायर कंपन्यांमुळे त्यांचे आयुष्य ‘पंक्चर’ झाले आहे.
सरकारचे धोरण धाब्यावर
एका अहवालानुसार हिंदुस्थानात रोज सुमारे 3 लाख टायरचा कचरा आयात करण्यात येतो. त्यावर रबर क्रॅम्प तयार करून त्याचा उपयोग रस्ते तयार करताना करावा असे सरकारचे धोरण आहे. पण प्रत्यक्षात पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी हे टायर वाड्यासारख्या ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये पाठवून त्यावर रबर पायरोलिसिसची प्रक्रिया करतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
■ युनायटेड किंगडम (युके) मध्ये वापरलेले टायर्स दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानात येतात.
■ या टायर्सवर प्रक्रिया करणारे ५२ कारखाने वाडा तालुक्यातील उसर, दिनकरपाडा, वडवली, बिलोशी, पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोन, कोनसई अशा गावांमध्ये आहेत. विष ओकणारे कारखाने सुरूच असल्याने वाड्यातील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
■ या कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे पाणीदेखील दूषित झाले असून शेतीचेही अतोनात नुकसान होत आहे.
■ या कारखान्यांमध्ये फायर सेफ्टीची कोणतीही सुविधा नाही, वनविभागाच्या परवानग्यादेखील घेतलेल्या नाहीत. नियम धाब्यावर बसवून टायरवर प्रक्रिया करणारे कारखाने सुरू आहेत.
■ या कारखान्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.
रबर पायरोलिसिस म्हणजे काय?
युनायटेड किंगडम व अन्य देशांमधून वापरलेले टायर प्रक्रिया करण्यासाठी वाड्यातील कारखान्यांमध्ये आणले जातात. हे रबर टायर्स ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये 500 डिग्री सेल्सिअसपर्यंत वितळवतात. प्रेशर कुकरसारखे बॉयलर्स त्यासाठी वापरावे लागतात. टायर वितळवल्यानंतर त्यावर रबर पायरोलिसिस ही प्रक्रिया केली जाते. यादरम्यान जे तेल निघते त्याचा वापर इंधन म्हणून अनेक उद्योगांमध्ये केला जातो. तसेच टायरमधल्या धातूच्या तारा वेगळ्या काढल्या जातात. या प्रक्रियेमुळे काजळीसारखी पूड तयार होते. त्याला ‘कार्बन ब्लॅक’ असेही म्हटले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक न केल्यास घातक वायू आणि रसायन वातावरणात मिसळून त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
■ वाडा तालुक्यातील 52 कारखान्यांमध्ये रबर पायरोलिसिसची प्रक्रिया कोणतीही काळजी न घेता केली जात असल्याने हवा पूर्णपणे विषारी झाली असून ग्रामस्थांच्या फुप्फुसांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेकांची नखे काळीठिक्कर पडली आहेत, पायाचे तळवेही काळवंडले आहेत. कार्बनचे कण अन्नातून पोटात जात असल्याने कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे.
■ स्थानिक शेतकरी संजय पाटील यांनी निवृत्तीनंतर वाड्यामध्ये सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांवर काजळीचा थर जमा झाला असून सौर पॅनल्सदेखील धुळीने माखले आहेत.
■ टायर कारखान्यांमुळे शेतीची तर वाट लागलीच पण ओढा, विहिरी व अन्य खोतांमधील पाणीदेखील प्रदूषित झाले असल्याचे दिसून आले आहे. या पाण्यामुळे पोटाचे विकारदेखील जडले