
टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली होती. त्यामुळे वडवली गावच्या हद्दीत असलेल्या चार प्रदूषणकारी कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. एम. डी. पायरोलिसेस, के. जी. एन. इंडस्ट्रियल, सन इंडस्ट्रियल व क्रेससेंट वेस्ट रिसायकलिंग हे कारखाने तातडीने बंद करण्याचे आदेश बजावले आहेत. तर दोन कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस दिले आहे. याशिवाय प्रदूषणकारी एका कारखान्याचा कार्यवाही अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नाल्यात नेहमीच टाकत असल्याने नाल्यातील मासे अनेक वेळा मृत पावले आहेत तर दूषित पाणी पिल्याने जनावरेही मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे डोळेझाक करीत असत. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील एम. डी. पायरोलिसेस या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली यात दोन कामगार व त्यांची दोन मुले असे चारजण ठार झाल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. या स्फोटानंतर प्रशासन खडबडून जागे होत चार प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. हे आदेश कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. आर. ए. रजपूत यांनी काढले आहेत.
बैल गेला आणि झोपा केला
एम. डी. पायरोलिसेस या कारखान्यात कामगार व त्यांची मुले असे एकूण चारजण ठार झाले. यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी हेही जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ कल्पेश पाटील यांनी सरकारकडे केली आहे. वेळीच कारखान्यावर कारवाई केली असती तर लोकांचे जीव वाचले असते.