शिवराज्याभिषेकाचे महत्त्व

>> वृषाली पंढरी

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे हिंदवी साम्राज्य दिन..हिंदूंच्या आणि भारतमातेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस. अवघ्या हिंदुस्थानभर आठशे वर्षे पसरलेल्या इस्लामी राजवटीला सुरुंग लावून अफाट शौर्य, त्याग, परिश्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी रायगडावर पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेक करून स्वतःला सार्वभौम राजा आणि छत्रपती घोषित केले. हिंदू समाज आणि हिंदुस्थानचे भवितव्य सुरक्षित करत पवित्र भगव्या ध्वजाचे ‘हिंदवी स्वराज्य’ निर्माण केले.

शिवाजी महाराज राजे झाले, छत्रपती झाले तो दिवस होता. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 आणि विक्रम संवत 1730. यंदा या ऐतिहासिक स्फूर्तिदायी घटनेला 351 वर्षे झाली असून शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाची आज सांगता होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांचा जन्मदिवस, राज्याभिषेक दिन आणि निर्वाण दिनाला हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. त्याप्रमाणे आज म्हणजे 6 जूनला 351वा शिवराज्याभिषेक दिन आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गेले वर्ष 350 वे वर्ष असल्याने हा सोहळा दरवर्षीप्रमाणे केवळ 5 आणि 6 जूनला साजरा न करता 1 ते 6 जून असा आठवडाभर साजरा करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणली. त्यांचा राज्याभिषेक दिन हा नवी चेतना आणि नवी ऊर्जा निर्माण करतो. लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचे मूळ तत्त्व होते. शेकडो वर्षांपूर्वी गुलामगिरीने आणि आक्रमणांनी भारतीय जनता आत्मविश्वास गमावून बसली होती. आक्रमकांच्या शोषणाने आणि परिणामी तयार झालेल्या गरिबीने समाजाला कमकुवत केले होते. आपल्या सांस्कृतिक स्थळांवर, मंदिरांवर हल्ले करून लोकांचे खच्चीकरण केले होते. अशा कठीण वेळी जनतेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे कठीण कार्य शिवाजी महाराजांनी त्या काळात केले होते. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचा सामना केलाच, पण त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विश्वासदेखील जनतेमध्ये निर्माण केला.

या देशात अनेक शासक होऊन गेले, परंतु शून्यातून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य एकमेव ठरावे. शासन कमकुवत होतं. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते. त्यांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली असे नव्हे, तर सुराज्यदेखील घडवले. एक सार्वभौम राजा म्हणून त्यांनी लोकांच्या मनात सुराज्याचे विचार निर्माण करून सुशासन निर्माण केले. त्यांच्या अशा कामगिरीने ते इतिहासातील इतर राज्यकर्त्यांपेक्षा खूप वेगळे ठरतात. त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी शेतकरी विकास, महिला सशक्तीकरण यांसारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिले. त्यांची राज्यकारभार करण्याची पद्धत आजच्या राज्यकर्त्यानाही उपयुक्त ठरेल.

मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1932 रोजा (6जून 1674) रायगडावर सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि हिंदवी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तमाम मराठी समाजासाठी ही महत्त्वाची आणि गौरवाची घटना होती. शिवराज्याभिषेकाची तयारी अनेक महिने चालू होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणतीही ज्ञात परंपरा नसल्याने प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून शिवराज्याभिषेकासाठी काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास करून माहिती जमा केली, ज्यात गागाभट्टांचा सिंहाचा वाटा होता. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱयांतून लोकांना आमंत्रणे देण्यात आली होती. समारंभासाठी जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते.

6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्कारांबरोबर स्नान करून, कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला. या वेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. राजांचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब, दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या आसनावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान विविध नद्यांतून आणलेले जलपुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्याच जलपुंभातील पवित्र जलाने शिवाजी महाराजांबर अभिषेक करण्यात आला. त्या वेळी मंत्रोच्चारणाने वातावरण पवित्र झाले होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळून राजांना औक्षण केले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहीर,अलंकार परिधान केले. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकून चिन्हांनी सजवलेले होते. 32 मण सोन्याचे (त्या वेळी 14 लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. मोठय़ा स्वरात मंत्रोच्चार झाले. ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेला. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पदे, नियुक्ती पत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रs,शस्त्रs दान केली. समारंभ संपल्यावर शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोडय़ावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याच्या नेत्रदीपक सोहळ्याची सांगता झाली.