विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच मतदारसंघात ‘ईव्हीएम’मध्ये मोठा झोल झाला. ईव्हीएम मशीनमधील हा घोटाळा उघड करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी 3 डिसेंबर रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या मतदानास विरोध केला असून, गावात जमावबंदीचे आदेश देत 20 जणांना नोटीस बजावली. तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. गावात बंदोबस्तामुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, पोलीस आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला असून, ‘बॅलेटसाठी बुलेट झेलू, पण मतदान होणारच’, असा निर्धार केला आहे.
माळशिरस मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर हे विजयी झाले. परंतु मारकडवाडी गावात त्यांना तुरळक मतदान झाल्याने गावकऱयांनी ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून घोटाळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गावात फेर निवडणूक घ्यावी, त्यासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असा ग्रामपंचायतीने ठराव केला. मतपत्रिकेद्वारे मतदानाचा संपूर्ण खर्च गावकरी करतील, असाही निर्णय घेण्यात आला. यासंबंधीचे निवेदन सरपंच व ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. मात्र, प्रशासनाने ही मागणी फेटाळली. परंतु ग्रामस्थ मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यावर ठाम आहेत.
प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा
प्रशासनाने मतदानासाठी पुढाकार घेणाऱ्या 20 जणांना नोटीस बजावली. गावात जमावबंदी आदेश लागू केला. मतदानासाठी बाहेर पडल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मतपत्रिका छापल्या; फलक लावले
जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या दडपशाहीला भीक न घालता ग्रामस्थांनी मतपत्रिका छापल्या आहेत. गावात फलक लावले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही कोणाला मतदान केले याची ही मतदान चाचणी आहे.
…तर राज्यभर उद्रेक पसरेल ः उत्तम जानकर
शासन आणि प्रशासन ईव्हीएममधील घोटाळा लपविण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत आहे. मात्र, हे गाव लढवय्यांचे आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान चाचणी होणार असून, ईव्हीएम घोटाळ्याचे खरे पितळ उघडे पडणार आहे. प्रशासनाने व पोलिसांनी दंडेलशाही सुरू केली आहे. आंतरवाली सराटीसारखी लाठीचार्ज पिंवा गोळ्या झाडल्या, रक्तबंबाळ झाले तरी बॅलेट पेपरवर मतदान करणारच आहोत. प्रशासनाने गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला तर त्याचा उद्रेक होईल आणि तो महाराष्ट्रभर पसरेल. त्यामुळे प्रशासनाने दंडेलशाहीचा उपयोग करू नये, असा इशारा आमदार जानकर यांनी दिला.