मतदान हा तुमचा आवाज आहेच, तसेच देशाचे भवितव्य ठरवणारा निर्णय आहे; केजरीवाल यांचे महत्त्वाचे आवाहन

दिल्ली विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. दिल्लीत काही पक्षांकडून आणि काही नेत्यांकडून पैशांचे, वस्तूंचे आमिष दाखवण्यात येत आहे. मात्र जनतेने कोणत्याही प्रलोभनांना आणि भूलथापांना बळी पडू नये. जनतेचे मत विकात घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, तुमचे मत हे तुमचा आवाज आहेच, त्याचबरोबर देशाचे भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीनेही तुमचे मत महत्त्वाचे आहे, त्यामुळे कशालीही भूलून तुमचे मत विकू नका, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

भाजपच्या भ्रष्ट लोकांनी वाटलेले पैसे घ्या. त्यांनी लुटलेले हे तुमचेच पैसे आहेत. पैसे घ्या, पण तुमचे मत विकू नका. तुमच्या मताची किंमत साडी, ब्लँकेट किंवा 1100 रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला मतदानाचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तमदान करताना कोणत्याही भूलथापा, प्रलोभने यांना भूलू नका. काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

दिल्लीसमोर आणि देशासमोर अनेक समस्या आहेत. काही लोकांना वाटेत की, मते विकत घेत सत्ता मिळवता येते. मात्र, त्यांना दाखवून द्या की, दिल्लीतील जनता विकली जात नाही. आम्ही मते विकत नाही. तसेच काही नेते पैसे, वस्तू वाटताना शपथ देत आहेत. अशा शपथा पाळू नका, अशा शपथा मोडल्याने कोणतेही नुकसान होत नाही. काही नेते मतदान करण्यासाठी मुलाबाळांची आणि देवाची शपथ देत आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. जनतेने अशा शपथा तोडून मतदान करावे, ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आपण जेव्हा एखाद्या पवित्र आणि प्रामाणिक कामासाठी शपथ घेतो, तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होते. जर आपण एखाद्या बेईमान व्यक्तीकडून पैसे घेत असाल आणि तो आपल्याला शपथ देत असेल अथवा घ्याला सांगत असेल, तर ती शपथ लागत नाही. ती खोटी शपथ आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.