कोतूळ गावातून दारूची बाटली हद्दपार करण्यासाठी मतदान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोले तालुक्यातील कोतूळ गावात दारुबंदी करण्याचा ठराव कोतूळ ग्रामपंचायतने घेतलेल्या सर्वसाधारण आणि महिला ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर व संगमनेर येथील दारूबदी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी कोतूळ गाठले. दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांनी गुरूवारी कोतूळ येथील महिलांचे दारूबंदीबाबत मतदान घेतले.

यावेळी गावातील शेकडो महिलांनी मतदानस्थळी उपस्थित राहून दारूबंदीसाठी मत नोंदवत कोतूळ गावात बाटली आडवी करण्याची मागणी केली. दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांसमोर कोतूळ गावातील महिलांनी उत्स्फुर्तपणे पुढाकार घेत दारूबंदीसाठी मत नोंदवले. त्यामुळे गावत दारूची बाटली हद्दपार होण्याच्या मोहीमेत महिलांनी पुढाकार घेतला.

अनेक महिलांनी दारुबंदीस सकारात्मक प्रतिसाद दिला. एक महिला म्हणाली की, गावात दारुची अनेक दुकाने आहेत. यामुळे लहान वयातच मुलांना सहजासहजी दारू उपलब्ध होते. ते दारू पिऊन कोठेही भटकतात, शाळा कॉलेजात जात नाहीत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर महिलांनी सांगितले की, आम्हाची दररोज रोजंदारीचे काम केल्याशिवाय चूलच पेटू शकत नाही. आम्ही मुलाबाळांचा कुटुंबाचा स्वयंपाक करून रोजंदारीवर जातो तेव्हा दिवसाला अडीचशे रूपये मिळतात. पण सायंकाळनंतर रोजंदारीवरून घरी आल्याबरोबर नवरा दारूसाठी पैसे हिसकावून घेतो आणि पैसे नाही दिले तर मारहाण करतो. त्यामुळे दारुबंदीला पाठिंबा असल्याचे महिलांनी सांगितले.

दारूपायी आमच्या अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारूबंदी झालीच पाहीजे. दारूमुळे मुले शिक्षण घेत नाहीत व चुकीच्या मार्गाला जातात. कोतूळ येथील दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदान केंद्रावर महिलांनी प्रतिक्रिया दिल्या. कोतूळ गावातील महिलांनीच उत्स्फुर्तपणे दारूबंदीसाठी मतदान करत गावात कायमस्वरूपी दारूची बाटली हद्दपार करण्याची मागणी केली.