
अमेरिकेत आता मतदारांना मतदार नोंदणी अर्ज भरताना नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट सादरा लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेतील बदलांशी निगडित एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सह्या केल्या. या वेळी ट्रम्प यांनी मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याच्या हिंदुस्थान आणि ब्राझील या देशांचे कौतुकही केले. हे देश नवी पद्धत स्वीकारत आहेत आणि आपण अजून सेल्फ अटेस्ट करण्याची जुनीच पद्धत धरून बसलो आहोत, असेही ते म्हणाले.
मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांचा समावेश होऊ नये आणि मतदान घोटाळा होऊ नये यासाठी ट्रम्प यांनी मतदार नोंदणी अर्ज भरताना नागरिकत्वाचा दाखला सादर करण्याचा नियम आणला आहे. सध्या अमेरिकेत मतदार नोंदणीसाठी पासपोर्ट किंवा जन्म प्रमाणपत्र दाखवण्याची गरज पडत नाही. दरम्यान, 2020मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बोगस मतदान झाल्यामुळे आपला पराभव झाल्याचा दावा केला होता.
आदेशात काय महत्त्वाचे?
मतदानासाठी नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट, चालक परवाना किंवा जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ट्रम्प यांच्या आदेशात राज्यांना सहकार्य करण्याची, मतदार याद्या शेअर करून निवडणुकीशी निगडित गुह्यांच्या तपासात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक संपल्यानंतर मिळणारे मेल-इन बॅलेट अवैध मानले जाईल. जर ट्रम्प यांच्या आदेशाचे एखाद्या राज्याने पालन केले नाही तर त्या राज्याला दिला जाणारा निधी रोखला जाईल, असेही ट्रम्प यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.