ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक आल्याने मतदारराजाची यंदाची दिवाळी जोरात आहे. सर्वत्र प्रचाराचे फटाके फुटायला सुरुवात झाली असून यात मतदारांची चंगळ झाली आहे. सुगंधी उटणं, चंदनाचा साबण, फराळ, ड्रायफ्रूट्सचे बॉक्स आणि आकर्षक भेटवस्तू घरोघरी पोहचवल्या जात आहेत. यंदाच्या दिवाळीची बातच काही न्यारी आहे.
दिवाळीचाच मुहूर्त साधून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कशाप्रकारे पोहोचता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. अगदी आकाश कंदिलावरही निवडणूक चिन्ह आणि उमेदवारांचे चेहरे दिसू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी पणत्या, दिवे यांसासाठीही संपर्क साधल्याची माहिती धारावीच्या कुंभारवाडय़ातील विक्रेते दिलीप राठोड यांनी दिली. आपापल्या मतदारसंघातील महिला बचतगटांकडे जाऊन दिवाळी खरेदीनिमित्त महिला मतदारांना जोडण्याचा प्रयत्नही अनेक उमेदवार करताना दिसत आहेत. दिवाळीला लागूनच निवडणूक आल्यामुळे आकाश कंदील, पणत्या, सजावट साहित्य, फटाके, फ्लेक्स बोर्ड यांचे महत्त्वही प्रचंड वाढले आहे. छपाई व्यावसायिकांचा भावही चांगलाच वधारला आहे.
मोठय़ा विक्रेत्यांकडून घाऊक प्रमाणात दिवाळी भेटवस्तूंची आणि फराळाची खरेदी केली जाते. दरवर्षीच्या तुलनेत ही उलाढाल किमान 50 टक्क्यांनी वाढली आहे. निवडणुकीमुळे बाजारातही तेजी दिसून येत आहे. त्यात मतदारांसोबतच व्यापारीवर्गाचीही चांदी झाली आहे.
काही बचत गटांनी राजकीय पक्षांच्या मागणीवर उत्साह दाखवला तर काहींनी त्यांची मागणी फेटाळून लावली. अनेक पक्षांनी महिलांना साडया वाटप किंवा विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी विभागातील महिलांच्या ग्राहकांच्या नावांची यादी मागितली होती. परंतु, आम्हाला यात पडायचे नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना याद्या दिल्या नाहीत, असे कळव्यातील सहज महिला बचत गट आणि सखी सोबती बचत गटाच्या अध्यक्षा सीमा घाणेकर यांनी सांगितले.
दिवाळीनिमित मतदारराजाला सर्वपक्षीय भेटवस्तू मिळत असून घरोघरी जाऊन या भेटवस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. यात अभ्यंगस्नानाच्या पॅकेजमध्ये सुगंधी तेल, उटणे, साबण, पणत्या, रांगोळी, आकाशकंदील, अत्तर आणि फटाके आदींचा समावेश दिसत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना साडय़ा आणि अन्य गोष्टींचे वाटपही करण्यात येत आहे. महिला बचत गटांशी संपर्क साधून त्यांच्याकडून महिलांच्या नावाच्या याद्या घेऊन संख्येनुसार भेटवस्तू दिल्या जात आहेत.