विधानसभा निवडणुकीत जनता गद्दार आमदार यड्रावकरला धडा शिकवणार; भास्कर जाधव यांचा घणाघात

कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. याच महालक्ष्मीसमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिला होता. पक्षाने आमदार यड्रावकरना मंत्रीपदाची संधी दिली. मात्र, संधीसाधू यड्रावकरनी गद्दारी करत उध्दव ठाकरेंना दगा दिला. शिरोळ तालुक्यातील जनता हे विसरली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिरोळ तालुक्यातील जनता गद्दार आमदार यड्रावकरला धडा शिकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा घणाघात शिवसेनेचे पूर्व विदर्भ, सांगली, सातारा, कोल्हापूर विभागीय संपर्क नेते भास्कर जाधव यांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिरोळ विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार आणि जिंकणार आहे. शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांनी गावागावात, घराघरात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पेटवावी. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही जाधव यांनी केले. शिवसेनेवर महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मताच्या रूपाने विश्वास दाखवला. तो विश्वास विधानसभा निवडणुकीत सार्थकी ठरवण्यासाठी शिरोळ तालुका शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिकांचा संवाद कार्यकर्ता मेळावा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला भास्कर जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणारच, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.