मतं दिलीत म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झालात, अजितदादांचा बारामतीकरांना दम

बारामती तालुक्यात मेडद येथे निवेदने देऊन बरेच महिने झाले तरी काम झाले नाही, असे वारंवार सांगणाऱया कार्यकर्त्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दांत त्यांनी निवेदने देणाऱया कार्यकर्त्यांना खडसावले.

बारामती तालुक्यात अजित पवार दौऱयावर होते. मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाने उभ्या केलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार भाषण करत असताना काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदने वाचत अधिकाऱयांना बोलावून ही कामे हात वेगळी करत होते व अधिकाऱयांना यामध्ये लक्ष घाला, अशी सूचना करत होते. याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरेच महिने झाले हे काम झाले नाही, असा धोशा लावला. त्यानंतर दुसऱयाही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सूर मिसळला. हे पाहून चिडलेल्या अजित पवार यांनी चेहऱयावर तसा आव न आणता एक वाक्य वापरले. ते म्हणाले, तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला.

अजित पवार नेहमीच खासगीत बोलताना राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या तुलनेत असे म्हणत शरद पवार यांच्या कामाशीही तुलना करतात. आजही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या एक शब्द वापरला. पाच वर्षात अशी कामे करायची की, कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत, अशी कामे आपण केली पाहिजेत. आपल्याला करायची आहेत.

ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय!

खराडवाडीतील लोकांनी लोकसभेला मते दिली नाहीत. तेथील काही जण समोर दिसताच त्यांची नावे घेऊन उल्लेख केला. परंतु नाराजी सावरत त्यांनी जाऊ द्या. मला माणूस दिसला की आठवतं, असे सांगून ते म्हणाले, बारामतीकरांनी त्यांना (सुप्रिया सुळे) मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय, शेवटी ‘ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय’ असे तीन वेळा म्हणत दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे संकेत दिले.