लाडक्या बहिणींना बाळासाहेबच आठवले! सर्वच केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेमुळे महिला आपल्याच पारडय़ात भरघोस मतांचे दान टाकतील, अशी अपेक्षा महायुतीने ठेवली. मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी बहुसंख्य महिलांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार आठवले आणि त्यांनी मिंधेंच्या ‘थापां’ना न भुलता परिवर्तनासाठी मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई शहर व उपनगरांतील सर्व मतदान पेंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अगदी दुपारच्या सुमारासही महिलांची गर्दी होती. एकीकडे मिंधे सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. मात्र बदलापूरसारखी घटना घडल्याने महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मतदानासाठी बहुसंख्येने घराबाहेर पडलेल्या महिलांनी मिंधे सरकारच्या थापांना न भुलता मतदानाचा हक्क बजावला. अनेक महिलांनी पक्ष पह्डापह्डीच्या गलिच्छ राजकारणाविरोधातील राग मतपेटीतून व्यक्त केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्ष चिन्ह चोरण्याच्या प्रकारावर काही महिला मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मतदानावेळी आम्हाला योजना आठवल्या नाहीत, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे जाज्वल्य विचारच आठवले. त्याच जाणिवेतून आम्ही मतदानाचा हक्क बजावला, अशी प्रतिक्रिया महिला मतदारांनी दिली.

महाराष्ट्र ही संतांची भूमीगद्दारी आम्हाला मान्य नाही!

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक महापुरुषांच्या पराक्रमांचा इतिहास लाभलेले आपले राज्य आहे. आपल्या राज्यात पक्ष फोडोफोडी, गद्दारीचे जे प्रकार घडले ते आम्हाला मुळीच पटलेले नाहीत. मुंबईत शिवसेना आणि मराठी माणूस यांचे घट्ट नाते आहे. त्यामुळे कुणी कितीही आमिषे दाखवली तरी आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया गोरेगावातील एका महिलेने दिली.