
पुणे-सातारा महामार्गावर वोल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरुप बचावले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
खासगी वोल्वो बस कोल्हापूरहून पुण्याकडे येत होती. यादरम्यान खेड शिवापूरजवळ बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. बघता बघता क्षणात बसने पेट घेतला. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या. चालकाने तात्काळ बस थांबवल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नाने अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. बसला आग नेमकी कशामुळे लागली याबाबत स्थानिक पोलीस आणि बस कंपनी तपास करत आहेत.